कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार – जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर

सोलापूर, दिनांक 20:- जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झालेली असून या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केले.

कामती तालुका मोहोळ येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित पर्यटन चर्चासत्रात उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर मार्गदर्शन करत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादिर शेख, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी किरण जमदाडे, यांच्यासह अन्य कृषि पर्यटन केंद्राचे संचालक व पत्रकार उपस्थित होते.
जिल्ह्यात कृषी प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते यासाठी योग्य नियोजन व प्रसिद्धी मोहीम राबविल्यास कृषी पर्यटनाला चालना मिळून
यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकतो यासाठी एमटीडीसी आणि सांस्कृतिक विभागाद्वारे उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती, अनुदान व योजना प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबद्दलची माहिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यापर्यंत तसेच पर्यटन केंद्र चालकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी पर्यटन केंद्रांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी श्री. नाटेकर यांनी सांगितले.
सन 2016 मध्ये सुरू झालेल्या कृषी पर्यटन धोरणात 2024 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना विविध अनुदान आणि सहाय्य मिळवून देण्यासाठी अनेक योजना समाविष्ट आहेत. जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक वर्षी लाखो भाविक येतात. या भाविकांच्या संख्येचा वापर करून स्थानिक व्यवसायाला खूप मोठा वाव मिळेल असे त्यांनी सांगितले.
आपला देश शेतीप्रधान आहे, आणि कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीच्या विकासासाठी, केवळ पारंपरिक पद्धतींचा उपयोग करून चालणार नाही. शेतीला शाश्वत बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणात सुधारणा करण्यासाठी, कृषी पर्यटन (ऐग्रो टूरिझम) अत्यंत आवश्यक असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
अनेक गावं त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि कृषी संसाधनांचा उपयोग करून पर्यटन स्थळे विकसित करत आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. शासनाने या उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कृषी पर्यटनाबद्दल संशोधन आणि जागरूकता वाढविणे हे महत्वाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील आणि पर्यटन क्षेत्रातही विकास होईल. पंढरपूर सह मोहोळ तालुक्यात कृषी पर्यटनाला जालना देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही श्री इथापे यांनी यावेळी सांगितले.
कृषी पर्यटनाच्या विषयावर चर्चा करताना आपल्याला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि सरकारी धोरणांची माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे आपल्याला विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलता येईल, असे मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक व गटविकास अधिकारी किरण जमदाडे यांनी सांगितले.
चिंचणी तालुका माळशिरस येथील श्री. मोहन अनपट यांनी चिंचणी ग्राम पर्यटन विकास केंद्राच्या माध्यमातून चिंचणी ग्रामस्थांनी केलेल्या विकासाची माहिती सांगितली. चिंचणी ग्रामपंचायत विकास केंद्र मागील तीन वर्षापासून सुरू असून मागील दोन वर्षात 80 लाख रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती दिली. 65 कुटुंबाच्या गावाने पर्यावरण व पर्यटनाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने आगेकूच केलेली आहे व यातून ग्रामस्थांचा आत्मसन्मान ही वाढलेला आहे. तसेच जल पर्यटन आराखड्यात ही आपल्या गावाचा समावेश झालेला असून यातूनही गावाला नक्कीच लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. सोलापूरचा हुरडा राज्य, देश व जागतिक स्तरावर घेऊन जाण्यास सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन श्री गजानन बुधानी यांनी केले. तसेच सोलापूरच्या पर्यटन विकासात जिल्हा प्रशासनाने पर्यटन केंद्र चालवणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी सहकार्य करावे असे आवाहनही केले.
शेतकऱ्यांना या व्यवसायात सामील करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या चर्चासत्रात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटनामुळे फायदे कसे मिळवता येतील यावर चर्चा झाली. प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या योजनांवर चर्चा केली.
कृषी पर्यटनाच्या विकासासाठी योग्य दिशा आणि संधी यावर चर्चा झाली, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
प्रारंभी सिनाई कृषी पर्यटन केंद्राचे संचालक लहू आवताडे यांनी प्रस्ताविक केले व या चर्चेसत्रच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. तर श्री. अंकुश आवताडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *